चढाई मकरंदगडाची
Posted by Arvind Telkar on Saturday, March 1, 2014
Under: Nature
ट्रेकिंगची "क्रेझ' नेहमीच वाटते. लांबून सोपा वाटणारा एखादा गड किंवा किल्ला प्रत्यक्ष चढताना थरार अनुभव देतो. एकदा तो सर केला की त्याचा आनंद औरच असतो. प्रत्येकाने कधी ना कधी असं रांगडं पर्यटन करायलाच हवं. असेच काही रांगडे अनुभव... तुम्हालाही वेगळ्या वाटेचा आनंद देणारे आणि कडे-कपारीतल्या जगात जाण्यासाठी प्रेरणा देणारे...
ऐन वेळी बदललेला बेत एक थरारक अनुभव पदरात टाकून जाईल याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती. ऐन पावसात एकान्तातल्या रांगड्या मकरंद गडाने एक धम्माल अनुभव दिला.
नेटवरचे चंद्रगडाचे फोटो पाहिले. त्याचं कातिल रुपडं पाहून आम्ही खुळावलो होतो. चंद्रगडाचा परिसर असा असेल तर खुद्द गड कसा असेल? केवळ या कल्पनेनेच कधी एकदा त्या गडावर स्वारी करतो, अशी आमची स्थिती झाली होती. महाबळेश्वरहून चंद्रगडाला जाता येत असल्याची माहिती आमच्या एका भटक्या मित्राने दिली होती आणि त्यासाठी एका पूर्ण दिवसाची तंगडतोड करावी लागत असल्याचंही तो बोलल्याचं लक्षात होतं. दिवसभर तंगडतोड करण्याऐवजी सरळ खुष्कीच्या मार्गाने जावं असं ठरवलं.
चंद्रगडावर जाण्यासाठी वाई-जोर-ढवळ्या घाट-ढवळ्या गाव-चंद्रगड असा दुसरा मार्ग आम्हाला समजला. त्याच रस्त्याने जावं हा निर्णय पक्का झाला. ठरल्या वेळी आम्ही जमलो आणि सातारा रस्त्याने मार्गी लागलो.
गाडी धावत असतानाच चंद्रगडाबाबत चर्चा सुरू झाली. ढवळ्या घाटातून गाडी जाऊ शकत नसल्याचं वर्तमान एका मित्राने दिल्यावर काय करावं हा आमच्यापुढे पडलेला गहन प्रश्न. सुदैवाने या मित्राने महाबळेश्वरचं एक जुनंपानं पॅम्प्लेट आणलं होतं नि ते पाहत असताना प्रतापगडाजवळचा मकरंद गड सर करता येईल हे लक्षात आलं. आमच्यापैकी कोणी कधी मकरंद गडावर गेला नव्हता. घोड्याच्या खोगिराप्रमाणे दिसणाऱ्या या गडाचं याआधी केवळ लांबून दर्शन घेतल्याचंही लक्षात आलं.
झालं! बेत बदलला आणि वाईकडे वळू पाहणारी गाडीची चाकं महाबळेश्वरच्या पसरणी घाटाकडे वळली. महाबळेश्वर पार करून आम्ही आंबेनळीच्या घाटात शिरलो. आता माहितीनुसार पुढे पार हे गाव आणि तिथून पुढे मकरंद गड. गाडी पार फाट्यावरून वळली तेव्हा पहिल्याच पुलावर काही पोरं खेकडे पकडण्याच्या मोहिमेत गुंतलेली दिसली. त्यांना माहिती विचारल्यावर 'सरळ पारकडे जा' हे उत्तर मिळालं. रस्ता मस्तच होता. दोन्ही बाजूंना दाट झाडी. क्षणात कधी डाव्या हाताला खोल दरी आणि क्षणात डोंगरांचे सुळके, असा उत्साह वाढवणारा तो मार्ग होता. रस्त्यावर उजवीकडे पार गावाची पाटी दिसल्यावर आम्ही तिकडे वळलो. या भागात पावसाची कृपादृष्टी असल्यामुळे सगळीकडे "खल्लास' हिरवाई होती. मध्ये एका ठिकाणी थांबलो तेव्हा कळलावी फुलं नि नंतर एका देखण्या फुलपाखराच्या बागडण्याचा नजारा पाहता आला. गावात पोचल्यावर मकरंद गड अगदी विरुद्ध दिशेला असल्याची माहिती मिळाली आणि "अबाऊट टर्न' करत पुन्हा आम्ही रस्त्याला लागलो.
आम्हाला शिरवली-हातलोट रस्त्याने जायचं होतं. हातलोटच्या अलीकडे एक भन्नाट जा
गा दिसली. दाट जंगल नि मधून जाणारा एकाकी शांत रस्ता. झाडं एवढी उंची आणि दाट होती, की भर दिवसाही तिथे अंधारलं होतं. त्या जागेला आम्ही 'अंधारबन' असं नावही देऊन टाकलं. हातलोट दिसायला लागलं आणि डावीकडे मकरंद गड सामोरा आला. खरं तर मधू-मकरंद गड असे हे जोडकिल्ले आहेत. पण मधुगडावर जायला रस्ताच शिल्लक राहिला नसल्याचं समजल्यानं फक्त मकरंद गडावर जायचं पक्कं केलं. गावात शिरलो आणि पाऊस अक्षरशः कोसळायला लागला. गावातले एक गृहस्थ भगवंतराव बरोबर यायला तयार झाले. भर पावसात रस्त्याला लागलो. मकंरद गड तसा फार अवघड वगैरे नाही. रस्ताही दाट जंगलातून जातो. वाट म्हणजे केवळ सुख. सभोवताली पसरलेली हिरवीगार भातशेती, त्यात लाल कौलांची छोटी घरं, मधून जाणारी चिखलाची पायवाट आणि मागे ढगांचा बुरखा पांघरलेला टंगाळ्या मकरंद गड.
निसर्गाचा एक भव्य कॅनव्हास समोर उलगडला होता. त्यात बुडून जाणं हेच शहाणपणाचं लक्षण. चढणीला लागलो तेव्हा भगवंतरावांनी जळवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्याचं प्रत्यंतर काही वेळातच आलं. आमच्या एका मित्रावर जळवेनं हल्ला केला. पहिल्यांदा काही लक्षात आलं नाही; पण वाटाड्याची नजर बारीक असल्याने त्याने ती जळूबाई काढली. मग बाकीचेही सावध झाले. रस्ता चढणीचा होत होता आणि आम्ही चालत होतो. जंगलात भरपूर गवे असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही जरा जास्तच खूष झालो होतो. प्रत्यक्षात गवा सामोरा आला असता तर काय झालं असतं ही वेगळी बाब! वाटेत भूछत्रांनी लगडलेलं एक झाड "माझा पण फोटो काढा' म्हणत सामोरं आलं. आता वाट सरळ पठारावरून जात होती. आम्ही दोघं पुढे होतो. अचानक एका वळणावर पंखांचा फडफडाट ऐकू आला आणि समोरच एका देखण्या रानकोंबड्याने पंख फडफडवत खालच्या दरीतल्या जंगलात सूर मारला. एवढ्या वेगाने तो गडी पळाला की कॅमेरे असूनही आम्ही काही करू शकलो नाही. वाटेतल्या एका ओहोळात लालभडक खेकडेबुवा नांग्या सरसावून उभे होते. आम्ही जवळ गेल्यावर मात्र बुवा पळाले आणि त्यांनी एका खडकाबुडी आश्रय घेतला.
वाटेचा पहिला टप्पा आता संपला होता. समोर होतं घोणसूर. याला घोणसपूरही म्हणतात. घोणसूरचं मल्लिकार्जुनाचं देऊळ समोर उभं होतं. मुक्कामासाठी हे देऊळ फारच मस्त आहे. समोर मकरंद गड दिसत होता, पण वाट मुरमाची नि चढणीची होती. सरकत, आधार घेत जात राहिलो. समोर बुरजाप्रमाणे भलं मोठं टेंगूळ दिसत होतं, पण वाट त्याच्या उजवीकडील सोंडेवरून होती. ही सोंडही इतकी अरुंद, की एका बाजूला दरी, डावीकडे कडा आणि मधून वाट, असा प्रकार. धाडस करून गेलो एकदाचे. अखेर मकरंद गडावर पोचलो. भगवंतरावांनी आम्हाला थेट पाण्याच्या टाक्याकडे नेलं. तसं या गडावर आता काही बांधकाम शिल्लकही नाही. टाक्यातल्या थंड आणि नितळ पाण्याने आम्हाला आमचे श्रम विसरायला लावले.
आता खरी परीक्षा सुरू होणार होती...
पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूला शंकराचं एक मंदिर आहे. त्याला जायला दोन वाटा आहेत. एक जरा लांबून फिरून जाते, पण सुरक्षित आहे. दुसरी वाट भगवंतरावांसारख्या स्थानिकांच्या दृष्टीने शॉर्टकट असला तरी आपल्यासारख्यांची पुरती वाट लावणारी आहे. (अर्थात ही बाब आम्हाला या वाटेवरून वाट लागल्यानंतरच लक्षात आली!) वाटाडे मामा पुढे निघाले. टाक्याच्या शेजारूनच हा शॉर्टकट जातो. ही वाट कड्याच्या उतारावरचे उंच खडक आणि गवतातून जाते. "जरा जपून यावा बरं का' म्हणत मामा मजेत वाटेने चढायला लागले. एका वेळी एक भिडू जाऊ शकेल एवढीच वाटेची रुंदी. मामांच्या मागे आम्ही सगळे होतो. पावसामुळे पायाखालची जमीन जबर निसरडी झालेली. पुढे गेलेल्यांमुळे माती आणखीच घसरडी होत होती. उंच खडकांवर चढताना कसरतच करावी लागत होती. बरं, हाताने काही पकड घ्यावी, तर बाजूला होती काटेरी झुडपं आणि ओलं गवत. सरळसोट चढण. पाय चुकून जरी घसरला किंवा हाताची पकड निसटली तर मागे खोल दरी आ वासून वाटच पाहत होती. उजवीकडे टाक्याचे कातळ... अक्षरशः इंच इंच लढवत आम्ही वर जात होतो. मामा मधूनच धीर देत होते. या वाटेने पुन्हा उतरायचं नाही, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितल्यामुळे आमचं थोडं तरी धैर्य टिकून होतं. वर जाताना खाली पाहणं अर्थातच शक्य नव्हतं. या गडबडीत एका खडकाची पकड घेणंही अवघड होतं. पावसामुळे तो ओलाचिंब झाला होताच, शिवाय शेवाळलाही होता. इकडे पायाखालचा दगड निसटू पाहत होता. अखेर जोर लावत पाय उचलत, मोठ्या झुडपाची पकड घेत जोर लावला. नेमकं ते काट्याचं झुडूप निघालं. एक काटा बोटात कचकन घुसला, रक्तही वाहायला लागलं; पण झुडपाने आधार दिला, दगा दिला नाही. एकदाचा तो खडक पार केला आणि समोर मल्लिकार्जुनाचं छोटं मंदिर दिसलं...नीरव शांततेत देव जणू समाधी लावून बसला होता! मंदिर धुक्याने वेढलेलं होतं, पण आत पाण्याची कळशी भरलेली होती. तहानेने आम्ही हैराण झालोच होतो; जरा स्थिरस्थावर झाल्यावर खाली नजर टाकली आणि या वाटेने आपण वर आलो यावर विश्वासच बसला नाही... पुन्हा कधी पावसाळ्यात असल्या धोकादायक वाटेने वर यायचं नाही, हेही लगेच ठरवून टाकलं.
बसून भागणार नव्हतं. पाऊस पडायला लागला होता, धुकं दाटायला लागलं होतं. मंदिरासमोरच्या दुसऱ्या वाटेने निघालो. उतरून पुन्हा घोणसपूरच्या मंदिरात आलो. परतीच्या वाटेला लागलो तेव्हा सूर्यदेव डोंगराआड गडप झाला होता.
गाडी वेगाने धावायला लागली... गडाची ती 'डेंजर' वाट पुन्हा आठवायला लागली... पण आम्ही पुढे जात होतो आणि एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे भासलेला तो मकरंद गड काळोखाच्या पांघरुणात गडप होत होता...

In : Nature
Tags: nature mountain fort arvind telkar trekking