पर्यावरणातील बदलामुळे पेंग्विन उत्तरेकडे
Posted by Arvind Telkar on Friday, January 9, 2009
Under: Marathi
जागतिक पर्यावरणात बदल होतो आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी याबाबत संपूर्ण जगालाच धोक्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यातून कोणीही धडा घेत नाही, हे दुर्दैव. मानवी जीवनावर या बदलाचा हळूहळू परिणाम होतो आहे. परंतु धकाधकीच्या आजच्या जगात, पर्यावरणावर विचार करण्यासही कोणाची तयारी दिसत नाही. पशू-पक्ष्यांमध्ये मात्र त्याचा तातडीचा परिणाम जाणवू लागला आहे.
दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना देशाच्या पँटागोनिया प्रांतातील सुमारे २,५०० पेंग्विन उष्ण सागरी प्रवाहांमुळे गोंधळात पडले आणि प्रवाहात लोटले गेल्यामुळे उत्तर ब्राझीलच्या किना-यावर लागले. त्यातील निम्म्याहून अधिक पेंग्विन मृत्युमुखी पडले, तर उरलेले भुकेने कासावीस झाले होते. त्यांची अवस्था गंभीर आहे. ब्राझीलच्या साओ पावलो शहरातील एक ज्येष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पशूकल्याण महामंडळाचे पदाधिकारी व्हेलेरिया रुओप्पोलो यांनी नुकतीच ही माहिती दिली.
अन्य पेंग्विन प्रजातीच्या तुलनेत 'मॅगेलन पेंग्विन' (स्फेनिस्कस मॅगेलॅनिकस) काहीशा उष्ण प्रदेशात वास्तव्य करतात. दक्षिण गोलार्धातील हे पक्षी, दक्षिण चिले आणि अर्जेंटिनाच्या समशीतोष्ण आणि काहीशा शुष्क हवामानातील गवताळ प्रदेशांत, ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात घरटी बांधून प्रजोत्पादन करतात. हिवाळ्यात ते स्थलांतर करतात. प्रवासाच्या या काळात खाद्य मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर या काळात ते त्यांच्या आवडत्या 'अँकोव्हीस' जातीच्या छोट्या मासळीच्या शोधात भटकत असतात. मिळतील तेवढ्या प्रमाणात हे मासे खाऊन ते शरीरात चरबीचा मोठा संचय करतात. स्थलांतराच्या काळात त्यांना याच चरबीचा अन्न म्हणून मोठा उपयोग होतो. मोठ्या पक्ष्यांसोबत लहान पक्षीही स्थलांतर करतात.
या वर्षी स्थलांतर करताना सुमारे २,५०० पिलांची आई-बापांपासून ताटातूट झाली. नेहमीपेक्षा या पिलांनी बरेच जास्त म्हणजे २,५०० किलोमीटर अंतर कापले होते. साल्व्हाडोर देशातील बाहिया राज्यात ते पोचले. साओ पावलोपासून बाहिया १,४०० किलोमीटरवर आहे. नियमितपणे समुद्र किना-यावर जाणा-या लोकांनी हे पेंग्विन पाहिले आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या भागात पेंग्विन दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय पशूकल्याण महामंडळाचे सदस्य आणि सागरी पशू मदत केंद्राच्या सभासदांनी या पिलांची सुटका केली. ब्राझीलची पर्यावरण अधिकारिणी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थाच्या सदस्यांनी त्यांना मोलाची मदत केली.
गेल्या काही महिन्यांपासून पेंग्विनच्या या पिलांवर उपचार चालू होते. एकूण २,५०० पैकी ३७२ पिले वाचली. त्यांचे बँडिंग करून लष्कराच्या सी-१३० विमानातून दक्षिण ब्राझीलच्या पेलोटास शहराजवळच्या कॅसिनो बीचवर आणण्यात आले. तेथे रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागरात सोडून देण्यात आले. या ठिकाणी यापूर्वीही काही पेंग्विनना सोडण्यात आले होते. आधी सोडलेले हे पेंग्विन आता वयस्क झाले असून, ते या नव्या पिलांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ निवासस्थानी, म्हणजे अर्जेंटिनातील पेंटागोनिया प्रांतात पोचवितील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या पिलांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न करणारे सुमारे २०० लोक या ठिकाणी जमले होते. पिलांना समुद्रात पोहताना पाहून त्यांनी जल्लोष केला. आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे सुटका कार्य ठरले.
दक्षिण गोलार्धात राहणा-या पेंग्विनच्या १७ प्रजातींपैकी मॅगेलन ही एक प्रजात आहे. त्यापैकी काही प्रजाती अंटार्क्टिकावरही राहतात. मॅगेलन प्रजातीचे पक्षी आकाराने आणि वजनाने मोठे असतात. त्यांचे वजन सरासरी चार किलो असते. पांढरी छाती आणि काळ्या पाठीवर मानेजवळचा पांढरा पट्ट्यामुळे ते रुबाबदार दिसतात. त्यांचे डोकेही काळे असते. या प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली आहे. त्यांची संख्या २० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. वन्यजीव संवर्धन समितीतील तज्ज्ञांच्या मते सध्या केवळ प्रजोत्पादन करू शकणारी केवळ दहा लाख जोडपी शिल्लक राहिली आहेत. त्यांच्या संख्येतील ही घट केवळ पर्यावरणातील बदल, वाढते पर्यटन, तेलवाहू आणि अन्य जहाजांतून होणारी तेलगळती आणि कोळंबी पकडण्यासाठी लावण्यात येणा-या जाळ्यांमुळे ही संख्या रोडावल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पँटेगोनियाच्या दक्षिण टोकाजवळील पर्यावरणात बदल होतो आहे. हिमनद्या वितळण्याचा वेग वाढल्यामुळे, समुद्राचा खारटपणाही कमी होऊ लागला आहे. वर्ल्डवाईड फंड फॉर नेचरच्या (डब्लूडब्लूएएफ) तज्ज्ञांनीही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमानात बदल होत असल्याचा नुकताच इशारा दिला आहे. ही वाढ सरासरी २ अंश सेल्सिअस एवढी असल्याचे सांगितले जाते. पर्यावरणातील हा बदल असाच चालू राहिल्यास, येत्या ५० वर्षांत एम्परर (अॅप्टॅनोडाईटस फॉर्सेटरी) आणि अॅडेली (पायगोसेलिस अॅडेली) या प्रजातीचे पेंग्विन नष्ट होण्याचा धोका आहे.
सागरी पर्यावरणात पेंग्विन हा एक महत्त्वाचा घटक समजलो जातो. पेंग्विनचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांना पेंग्विनबरोबरच दक्षिण गोलार्धाताली सागरी पर्यावरणातील बदलांची निरंतर नोंद घेता येते. केवळ पेंग्विनचेच नाही तर अन्य वन्यजीवांच्या अभ्यासातूनही बरीच माहिती मिळू शकते. पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आणि अन्नसाखळीतील प्रमुख दुवा असल्यामुळे, वन्यपशूंना संरक्षण देण्याची गरज आहे. राजकीय इच्छाशक्ती त्यासाठी आवश्यक आहे. ती जर नसेल, तर जागरूक नागरिकांनीच सरकारला त्यासाठी भाग पाडले पाहिजे.
In : Marathi
Tags: travel birds penguin india wildlife maharashtra