तळलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या
अन्नाची मागणी वाढल्यामुळे, पाम ऑईलची आयात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश
ठरला आहे. पाम ऑईल खरेदीत यापूर्वी चीनचा क्रमांक पहिला होता.
भारताने डिसेंबर २००९ या संपलेल्या वर्षात ७० लाख मेट्रिक टन पाम ऑईलची आयात केली आहे, असे मुंबईतील
"सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया' या संस्थेने ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी याच काळात चीनने ६४ लाख मेट्रिक टन पाम ऑईलची आयात केली होती.
त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा चीनची आयात २३ टक्क्यांनी वाढली होती, असे चीनच्या
"नॅशनल ग्रेन अँड ऑईल्स इन्फॉर्मेशन सेंटर'च्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती
मिळाली.
भारत सरकारने आयात कर रद्द केल्याने आणि देशांतर्गत पीक उत्पादन
घटल्यामुळे, भारतीय खाद्य प्रक्रिया उद्योगांनी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात
केली. पाम ऑईलसह एकून ९४ लाख टन खाद्य तेलाची भारतीय उद्योगांनी आयात केली. आयात कर
रद्द केल्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांच्या खर्चात मोठी कपात झाली आणि त्यामुळेच
मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करणे शक्य झाले, असे "सॉल्व्हंट
एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया'चे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी
सांगितले.
पाम ऑईलच्या वाढलेल्या निर्यातीचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या
मलेशियाला मोठा फायदा झाला आहे, असे सांगून मेहता म्हणाले, की भारताच्या लोकसंख्येत
दरवर्षी दोन कोटींची भर पडते आहे. त्याशिवाय देशातील दरडोई उत्पन्नातही सातत्याने
वाढ होत आहे. परिणामी प्रक्रिया केलेल्या खाद्यान्नाची मागणीही वाढू लागली
आहे.
प्रक्रिया केलेले खाद्यान्न निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लागणारे खाद्य
तेल, स्थानिक बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, निम्म्याहून अधिक
खाद्य तेल आयात करावे लागते. गेल्याच आठवड्यात ३० हजार मेट्रिक टन पाम ऑईलची मागणी
नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण खाद्यतेल खरेदीपैकी, प्रक्रिया उद्योगांचा वाटा ८० टक्के आहे. खाद्य तेलाच्या खरेदीमध्ये भारत दरवर्षी नवनवीन विक्रम नोंदवत आहे,
असेही मेहता यांनी सांगितले.